लॉकडाउनच्या खिडकीतून भाग २
विश्वासघातानंतरची सावधानता
पूर्वी म्हणजे फार पूर्वी भारतात दोन राजांमध्ये युद्ध होत, तेव्हा सूर्य मावळल्यानंतर ते थांबत असे. सूर्योदयापर्यंत त्या त्या तळावरील सैनिक बिनधास्त विश्रांती घ्यायचे. पुढे शत्रूकडून विशेषता अरबांकडून रात्रीची वेळ पाहुनच हल्ले होऊ लागले आणि सूर्यास्तानंतर युद्ध बंदीचा नियम कपोलकल्पीत वाटायला लागला. कुठल्याही देशातून लोक दुसर्या प्रदेशात सहज प्रवास करीत होते. मात्र., या प्रवासाच्या आडून एकमेकांच्या देशातील गुप्त माहिती मिळवण्याचे प्रकार वाढल्याने असावे, पण इतर देशातील लोकांना ओळखपत्राशिवाय व केवळ अधिकृतपणेच प्रवेश देण्यासाठी पासपोर्टने जन्म घेतला. त्यातीलही पळवाटांचा शोध घेऊन विश्वासघात होऊ लागल्याने व्हिजा या नव्या व्यवस्थेने जन्म घेतला. एखाद्या व्यक्तीकडे पासपोर्ट असला तरी आपल्या देशात त्याला येण्याच्या कारणाची माहिती घेऊन व त्याची खातरजमा करूनच प्रवेश देणे म्हणजे व्हिजा. त्यातही अनेकवेळा फसवणूक होऊ लागल्याने विमानतळांवर कुठल्या कुठल्या देशांमधील नागरिकांची कसून चौकशी करायची याबाबतही अलिखित नियम ठरले आणि माणसाच्या परस्परांविषयीच्या अविश्वासाची पातळी अधिक तिव्र होत चालली असतानाच जगावर करोना विषाणूच्या महामारीने आक्रमण केले आहे. जगभरात १४ लाखांहुन अधिक लोक या महामारीने बाधीत झाले असून मृतांचा आकडा १ लाखाच्या टप्प्यात आला आहे. या आजारावर अद्याप औषध नसल्याने व माणसांची हालचाल हेच त्याच्या पसरण्याचे प्रमुख माध्यम असल्याने जगभरातील माणसे घरांमध्ये बंद झाली आहेत, काही बंद होत आहेत. उद्योग, व्यवसाय बंद आहेत आणि जो तो या महामारीपासून जगण्याच्या आणि जगलो तरी पुढीच्या भविष्याच्या चिंतेत आहे. या परिस्थितीत सध्या अनेक विचारवंत करोनानंतरचे जग बदललेले असेल, असा अंदाज व्यक्त करीत आहेत. ते जग बदललेले म्हणजे नेमके कसे असेल, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना या करोनाचा प्रसार कसा झाला,याबाबत सर्व जगाचे काय मत झाले आहे, या दृष्टीकोनातून बघितल्यास जग कोणत्या दिशेने बदलू शकते, याचा अंदाज सहज बांधता येतो.
करोना विषाणू हा चीनने सर्व जगभर पसरवल्याची भावना जगभरातील नागरिकांची झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी मानवतेच्या शत्रुंनी करोना बाधीत लोक म्हणजे आपल्या शत्रूंच्या नाशासाठी जणू जैविक बॉम्बप्रमाणे वापरण्याचा विकृत विचार करून काही प्रमाणात त्याची अंमलबजावणी केल्याचेही दिसून आले आहे. म्हणजेच भविष्यातील जैविक युद्धाच्या चाचणीचा हा स्फोट आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. प्रयोगशाळांमध्ये संरक्षित करून ठेवलेले विेषाणू आपल्या शत्रूला संपवण्यासाठी सहज वापरले जाऊ शकतात, असा विचार करणार्या काळात आपण जगत आहोत. त्यामुळे या टप्प्यात माणूस त्याच्या सुरक्षेसाठी, जगण्यासाठी भूतकाळातील बेफिकीरी कमी करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. सध्या आपण काय करतो आहोत? कुठेतरी शेतकरी धान्य, भाजीपाला, फळे पिकवतो. ते बाजार समितीत विकण्यास आणतो. तेथे व्यापारी खरेदी करतो. तेथून पुरवठादार खरेदी करून किरकोळ विक्रेत्यांना पुरवतो व त्या विक्रेत्याकडून आपण त्या विकत घेऊन अत्यंत विश्वासाने खातो. आतापर्यंत आपण हे पिकवणारा कोण, त्याने त्या कुणाला विकल्या, तेथून त्या कुणी कुणी हाताळल्या व आपल्या घराजवळील विक्रेत्यापर्यंत नेल्या, याबाबत कुठलीही माहिती नसताना आपण त्या डोळे झाकून विश्वास ठेवून खात आहोत, पण करोना महामारीच्या विध्वंसानंतर आपण खरोखर डोळे झाकून आपल्या ताटात आलेल्या अन्नावर विश्वास ठेवणार आहोत का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असे नाही. ही काही नवी संकल्पना नाही. अन्नपदार्थांच्या आयात निर्यातीसाठी युरोपीयन देशांनी ही पद्धत कधीच आमलात आणली आहे. कोणते पदार्थ आयात करायचे याची मानके निश्चित केली असून ती वेळोवेळी जाहीर करून त्याच्या काटेकोर पालनानंतरच तेथे आयात होते. पण केवळ आयात-निर्यातीसाठी असलेल्या या पद्धतीची मागणी आता देशांतर्गत अन्नपदार्थांच्या विक्रीसाठीही होणार आहे. कारण या महामारीने आपल्याला नवीन धडा शिकवला आहे, तो म्हणजे माणसाचा माणसावरचा उडालेला विश्वास. त्यामुळे दुधाने तोंड पोळल्यास ताकही फुंकून प्यावे, या म्हणीचा प्रत्यय खर्या अर्थाने घेणार आहोत. त्यामुळे शेतमाल पिकवायचा आणि बाजार समितीत विकायचा ही पारंपरिक पद्धत आता मोडीत निघणार असून आपल्या दाराजवळ आलेल्या कुठल्याही विक्रेत्याकडून खाद्य पदार्थ खरेदी करण्याची पद्धत कालबाह्य होणार आहे. ग्राहक एक तर खात्रीचा उत्पादक शोधून त्याच्याकडून खरेदी करतील किंवा अशी ट्रेसिंग सिस्टिम असलेल्या ब्रॅण्डचीच वस्तू खरेदी करतील. ज्या अन्नाचा पिकवणारा माहित नाही व ज्याचा विक्रेता ओळखीचा नाही, अशा व्यक्तींकडून अन्नपदार्थांची खरेदी करताना लोक बिचकणार असून त्यातूनच खात्री व विश्वास असल्याशिवाय अन्नपदार्थांची खरेदी होणार नाही. परिणामी एका दुरच्या प्रदेशातून आलेल्या कुठल्याही खाद्यपदार्थावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे असा मोठ्याप्रमाणावर उद्योग करणार्यांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल किंवा त्यांनी तसे केले नाही तर स्थानिक पातळीवर उद्योगांना ग्राहकांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरावे लागणार आहे. त्यातून व्यवसायात नेमके कोणते बदल होऊ शकतील, याचा कल्पना विलास पुढल्या भागात...
श्याम उगले ९८८१०६५३७१
Comments
Post a Comment