राज्यातील बंड आणि नाशिककर

राज्यातील बंड आणि नाशिककर
राजीव गांधी यांनी पक्षांतर्गत बंदी कायदा आणल्यानंतर १९९१ पासून राज्यात शिवसेना, काँग्रेस, शिवसेना व आता राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांमध्ये झालेल्या प्रत्येक बंडात नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेतला  आहे. यामुळे क्रांतिकारकांची भूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आमदार पक्षांतर्गत बंडखोरीतही मागे नसल्याचे गेल्या २९ वर्षांत चार वेळा दिसून आले आहे.
 तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदीचा कायदा केल्यानंतर महाराष्ट्रात पहिले घाऊक पक्षांतर शिवसेनेचे तत्कालीन आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यावेळी शिवसेनेचे ५२ आमदार होते. त्यामुळे पक्षांतरासाठी एकतृतीयांशच्या हिशेबाने १८ आमदारांचा गट हवा होता. त्यासाठी भुजबळ यांनी १८ आमदारांच्या स्वतंत्र गटाची स्थापना केली. त्या पत्रावर आपली सही बनावट आहे, असे देवळालीचे तत्कालीन आमदार बबनराव घोलप यांच्यासह सहा जणांनी सांगत त्या बंडातून माघार घेतली; परंतु तोपर्यंत भुजबळ यांना हवा असलेला १८ आमदारांचा गट तेव्हाचे विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी स्थापनही केला होता. त्यामुळे सहा आमदारांनी माघार घेऊनही १२ आमदारांसह भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवले होेते. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेस पक्षात दुसरे बंड झाले. त्यावेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड पुकारले होते. शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी त्या आमदारांना फूस लावून फोडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडी सरकारकडे काठावरचे बहुमत असल्याने ते सरकार पाडून युतीचे सरकार आणण्याची राणे यांनी योजना होती. त्यावेळी बंडामध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार शिरीषकुमार कोतवाल सहभागी झाले होते. विलासराव देशमुख यांच्याविरोधात युतीने आणलेल्या अविश्वास ठरावाच्या आधीच विधानसभा अध्यक्षांनी या बंडखोर आमदारांचे निलंबन केले. यामुळे विलासराव देशमुख यांचे सरकार वाचले. त्यानंतर कोतवाल यांनी २००४ मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी केली. त्यात ते पराभूत झाले. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून येऊन काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. या बंडानंतर स्वत: नारायण राणे यांनीच २००५ मध्ये शिवसेनेत बंड केले. त्यावेळीही त्यांच्यासोबत सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे होते. त्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेचे गटनेते असल्याने त्यांच्यासोबत दोन तृतियांश आमदार नसूनही त्यांचे किंवा त्यांच्यासोबत पक्षाविरुद्ध बंड केलेल्या सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू शकला नव्हता. कारण गटनेते नारायण राणे यांनी पक्ष प्रतोदाची हकालपट्टी करून त्याजागी स्वताच्या मर्जितील बंडखोर आमदार विनायक निम्हन यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यावेळी कुणाहीविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई झाली नव्हती.
 आता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी बंड करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मताविरुद्ध जाऊन भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्रिपद मिळवले आहे. त्यांच्यासोबत दहा बारा आमदार असल्याचे सांगितले जात असून त्यातील काहीजण पुन्हा राष्ट्रवादीच्या तंबुत परतले आहे. या बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत नाशिकमधील माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, नरहरी झिरवाळ, नितीन पवार आदी पाच आमदार असल्याची चर्चा होती. त्यात जवळपास सर्वच आमदारांनी आम्ही राष्ट्रवादीच्या सोबत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या बंडातही नाशिकच्या आमदारांनी पुन्हा आपले आस्तित्व दाखवून दिले आहे. ही बंडाची प्रक्रिया सुरूच असून या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी कोण बंड करतात व कोण पक्षनिष्ठा राखतात, हे विधीमंडळातच कळून येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

लॉकडाउनच्या खिडकीतून

लॉकडाउनच्या खिडकीतून भाग ३