लॉकडाउनच्या खिडकीतून
जगभरात गुणाकाराच्या गतीने वाढणार्या करोना विषाणूचा प्रसार भारतातही त्याच वेगाने झाला तर आपली व्यवस्था केवळ अपुरीच पडणार नाही, तर त्या महामारीत ती अक्षरश: वाहून जाईल. त्यामुळे ती महामारी तिच्या परम बिंदूला आपल्या देशात पोहोचू नये म्हणून भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन २४ मार्चपासून लागू केले आहे. तेव्हापासून देशातील सर्वच उद्योग, व्यवसाय बंद आहेत. जवळपास सर्वच लोक घरांमध्ये बसून आहेत. प्रवास बंद आहेत, वाहने बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. कारखाने बंद आहेत आणि हे सर्व काही चालवणारा माणूस घरात लॉकडाउन झाला आहे. त्याला भाजी, किराणा आणण्याची काळजी लागली आहे. घरात धान्य, किराणा पुरेसा नसल्याने चिंतित होऊन तो पोलिसांचा डोळा चुकवून रस्त्यावर उतरून गर्दी करण्यात धन्यता मानत आहे. आपल्या भागात करोना नसल्याने उगीच घाबरण्याचे कारण नसल्याचा युक्तीवाद करून तो कृतीचे समर्थन करीत आहे. तसेच वेळ जात नसल्याने घराच्या खिडकीत, गॅलरीत उभा राहून रस्त्यावरून जा ये करीत असलेली वाहने न्याहाळत आहे. लोक अजूनही या संचारबंदीचे पालन करीत नसल्याने चिंता व्यक्त करीत आहे. रस्त्यावर जाण्याची धडपड करणारा आणि रस्त्यावर उतरणार्या लोकांविषयी नाराजी व्यक्त करणारे आपणच आहोत, याचाही त्याला विसर पडून हे असेच चालू राहिले तर करोना कसा थांबणार आणि लॉकडाउन कसे उठणार याची चिंताही त्याला सतावत आहे. लॉकडाउन सुरू होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले आहेत. मध्यमवर्गीय जीवन अजूनही सुरळीत सुरू आहे. हातावर पोट असणार्या मजुरांसाठीही अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते खारीचा वाटा उचलत आहेत. आपल्याकडे आपत्ती येवो अथवा आनंदाचा क्षण ते मोठ्या उत्सासात साजरे करण्याची परंपरा असल्याने या लॉकडाउनचाही उत्सव देशभर साजरा होत असल्याचे दिसत आहे. पण हे लॉकडाउन १४ एप्रिलनंतर उठण्याची शक्यता फार कमी आहे. तोपर्यंत भारतातील करोना बाधीतांचा आकडा कदाचित दहा हजारांचा टप्पा गाठेल आणि अनेक करोना बाधीत मानवी बॉम्ब तोपर्यंतही सापडलेले नसतील. या पंधरा दिवसांच्या काळात त्यांनी किती हजार लोकांना संगर्गित केलेले असेल याचा अंदाज नसेल. त्यामुळे सरकार हे लॉकडाउन आणखी वाढवण्याची शक्यता आहे. हे लॉकडाउन सरसकट असणार की केवळ बाधीत जिल्हे, शहरांमध्ये असणार हे केंद्र सरकार व राज्य सरकारे चर्चा करून ठरवणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यातील लॉकडाउन उठले तरी त्या जिल्ह्यांतर्गत हालचालींसाठी मुभा मिळेल, परंतु बाधीत शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमधून बाहेर पडण्यास व तेथे जाण्यास मनाई लागू राहणार आहे. या सर्व लॉकडाउनचे पालन करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला जुंपली जाईल. त्यामुळे सरकारी कार्यालये ओस पडून या कामासाठीच जुंपली जातील. तसेच प्रत्येक पंधरा दिवसांनी करोना मुक्त झालेल्या जिल्हा शहरांचा आढावा घेऊन तेथील लॉकडाउन काही अटीशर्तींसह उठवले जाईल. म्हणजे संपूर्ण देशातील लॉकडाउन उठण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा, देशभरातील रेल्वे वाहतूक, राज्यभरातील वाहतूक व्यवस्था बंद राहणार परिणामी कारखान्यांमधील उत्पादनांवर त्याचा परिणाम जाणवणार आहे.
देशातील सर्वच प्रमुख महानगरांमध्ये करोना विषाणू बाधीतांची संख्या मोठी असून अनेक शहरांमध्ये तबलिगी अजूनही दडी धरून बसले आहेत. त्यामुळे देशातील लॉकडाउन सर्वात शेवटी या मोठ्या शहरांमध्ये उठणार आहे. म्हणजे तोपर्यंत तेथील उद्योग, व्यवसाय ठप्प राहतील किंवा अत्यंत कमी कार्यक्षमतेने कार्यरत राहतील. त्यामुळे पुढील सहा महिने देशातील प्रमुख उद्योग व्यवसाय ठप्प असताना या देशाच्या जीडीपीवर काय परिणाम होईल, अर्थव्यवस्कथा वाढीचा वेग काय राहील, या बाबींवर अर्थतज्ज्ञ काम करतील व त्याचा अंदाज करतील, पण एक सामान्य माणूस आपणही या लॉकडाउनच्या खिडकीतून सजगपणे बघण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? असाच प्रयत्न या लेखमालेतून करण्याचा प्रयत्न केला आहे. तो बघूया पुढल्या भागात.
.. श्याम उगले ९८८१०६५३७१
नक्कीच चांगला initiative आहे.
ReplyDeleteसदर कालावधीतील आपले अनुभव, समाजातील विविध घटकावरील परिणाम, विश्लेषणयुक्त विचार इ प्रभावी व हृदयस्पर्शी मांडला, याची मला खात्री आहे..All the best 💐💐 .
छान माहिती आहे
ReplyDelete