लॉकडाउनच्या खिडकीतून भाग ३
शेतकर्यांची विक्री साखळी
भाग दोनमध्ये आपण कोरोना विषाणूच्या महामारीने जगभरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास उडवला आहे. त्यामुळे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दुध आदी खाद्यपदार्थाची खरेदी लोक खात्री असल्याशिवाय करणार नाहीत. म्हणजे खरेदी करताना त्यात काही धोका नाही ना याची खात्री करण्याचा प्रयत्न करतील. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करून शेतकरी, त्याच्या कंपन्या, गट किंवा शेतकरी पुत्र यांनी सध्याची विक्री व्यवस्था बदलण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. सध्या नाशिकमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू असून संचारबंदीमुळे द्राक्षे देशांतर्गत बाजार पेठेमध्ये पाठवणेही शक्य होत नाही. तसेच युरोपसह इतर देशांमधून मागणी घटल्यामुळे त्यांच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. यामुळे नाशिक शहरालगतच अनेक द्राक्ष बागायतदार थेट ग्राहकांना विक्री करता येईल का याचा विचार करीत आहेत. यासाठी समाज माध्यमांवर जाहिरातीही केल्या जात आहेत. तुलनेने स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांकडून द्राक्षांना मागणीही आहे. मात्र, एखाद्या शहराच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मागण्यांची पूर्तता करणे शेतकर्यांना शक्य होत नाही. कारण मागणीचे परिमाण व त्यासाठीचा वाहतूक व मनुष्पबळ खर्च शेतकर्याला परवडत नाही. त्यामुळे मागणी असूनही नाशिक शहरातील ग्राहकांना द्राक्ष मिळण्यास अडचणी येत आहेत. या एका उदाहरणावरून दिसून येते की, शेतकर्याची त्याची स्वताची विक्री व्यवस्था नाही, सध्या द्राक्ष विक्रीची जी व्यवस्था आहे, ती संचारबंदीमुळे कोलमडून पडली आहे.
सध्याची व्यवस्था म्हणजे शेतकर्यांनी बाजार समितीत शेतमाल विक्री करायचा. तेथून व्यापार्यांनी त्यांची स्वताची विक्री साखळी उभी केली आहे. त्या साखळीतून आपल्या घराजवळील भाजीमंडई, भाजीविक्रेता, किराणा दुकानदार, मॉल येथे आपल्याला त्या वस्तू उपलब्ध होतात. मात्र, शेतकरी ते ग्राहक यांच्या दरम्यान अनेक मध्यस्त असून ते त्यात मूल्यवर्धन करून त्यांचा नफ्याचा वाटा काढून घेत असल्याने ग्राहक व शेतकरी दोघांचीही पिळवणूक होत आहे. ही व्यवस्था आस्तित्वात येण्यापूर्वी व्यापारी शेतकर्यांच्या बांधावरून खरेदी करीत होते. मात्र, तेथे शेतकर्यांची फसवणूक होत असल्याने सरकारने शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या स्थापन केल्या. त्यातून विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळण्याची हमी वगळता शेतकर्याचा कोणताही फायदा झाला नाही.
आता कोरोनामुळे जगभरात आस्तित्वात असलेल्या सर्व व्यवस्था कोलमडून पडणार असून त्यातून कोरोनानंतरच्या जगात नव्या व्यवस्था निर्माण होणार आहे. या नव्या व्यवस्थेत शेतकर्यांच्या फायद्याची व ग्राहकांच्याही हिताची व्यवस्था जन्माला येणे सहज शक्य आहे. त्यासाठीची सर्व पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि त्यासाठीचे पुष्कळ मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे उद्याच्या नव्या जगात तशी व्यवस्था निर्माण होणे सहज शक्य असल्याचे मला तरी दिसत आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून जीडीपी आणि इतर तत्सम शब्दांना काहीही महत्व उरले नाही. मात्र, लॉकडाउन उठल्यानंतही जगभरातून करोनाची दहशत संपण्यासाठी काही काळ जाणार असून तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला केवळ शेतीक्षेत्रच वाचवू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, हे शेतीक्षेत्र भारताला वाचवत असताना त्यातून सर्वाधिक लाभ शेतकर्याला होणार असेेल तर त्या तज्ज्ञांच्या म्हणण्याला काही अर्थ उरणार आहे. अर्थात दुसरा कुणीही त्याच्या हातातील पैसे शेतकर्याच्या खिशात टाकणार नाही, तर त्यासाठी शेतकर्याने त्याची स्वताची व्यवस्था उभारण्याची आणि त्या व्यवस्थेतून त्याचा स्वताचा फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतमाल कुठलाही असो, त्याच्या विक्रीसाठी शेतकर्यांना एकत्र येऊन स्वताची विक्रीसाखळी उभारावी लागणार आहे. अन्यथा, देशाच्या अडचणीच्या काळात अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्या शेतीमध्ये खपणारा शेतकरी लाभापासून वंचित राहिला, अशी हळहळ करण्यातच भविष्यकाळ व्यतित करावा लागेल, असे दिसते. ती नवी संभाव्य विक्री साखळी नेमकी कशी असू शकते, याची अंदाज आपण पुढील भागात घेऊया.....
Comments
Post a Comment